अपन्हुती अलंकार (Apanhuti Alankar):-
अपन्हुती म्हणजेच झाकणे किंवा लपवणे होय. जेव्हा उपमेयाचा धिक्कार करून किंवा निषेध करून ते उपमानच आहे असे सांगितले जाते, तेव्हा हा अलंकार होतो.
उदाहरणार्थ:-
- आई म्हणून कोणी | आईस हाक मारी ||
ती हाक येई कानी | मज होय शोककारी ||
नोहेच हाक माते मारी | कुणी कुठारी ||
स्पष्टीकरण:- येथे आई म्हणून मारलेली हाक हे उपमेय आहे, तर मारी कुणी कुठारी म्हणजे कुर्हाड मारणे हे उपमान आहे. यामध्ये आईस मारलेली हाक म्हणजे कुर्हाड मारणे होय असे वर्णन आहे. यात आईस हाक मारणे या उपमेयाचा निषेध करुन कुर्हाड मारणे या उपमानाला महत्त्व आहे. म्हणून हे अपन्हुती अलंकाराचे उदाहरण आहे. - ओठ कशाचे देह देठचि फुलला पारिजातकाचे स्पष्टीकरण:- येथे ओठ हे ओठ नसून ते फुलाचा देठ आहे असे वर्णन आहे. म्हणून येथे अपन्हुती अलंकार आहे.
- हे हृदय नसे, परी स्थंडिल धगधगते स्पष्टीकरण:- येथे हृदय हे हृदय नसून धगधगते स्थंडिल आहे असे वर्णन केले आहे म्हणून हे अपन्हुती अलंकाराचे उदाहरण आहे.
- मानेला उचलीतो, बाळ मानेला उचलीतो
नाही ग बाई, फणा काढूनि नाग हा डोलतो
स्पष्टीकरण:- सदर उदाहरणात बाळ मान उचलतो या गोष्टीचा निषेध करून नाग फणा काढून डोलतोय याला महत्त्व दिले आहे. त्यामुळेच हे अपन्हुती अलंकाराचे एक उदाहरण आहे.
- न हे नयन, पाकळ्या उमलल्या सरोजातिल
न हे वदन, चंद्रमा शरदिचा गमे केवळ
स्पष्टीकरण:- पहिल्या ओळीत कवीने नयन म्हणजेच डोळ्याचे वर्णन केले आहे. त्यात डोळ्याची तुलना कमळाच्या पाकळ्याशी केली आहे. यात नयन हे उपमेय आहे कमळाच्या पाकळ्या उपमान आहे. येथे डोळे हे डोळे नसून त्या कमळाच्या पाकळ्या आहे, असे सांगताना उपमेयाला दूर सारून म्हणजे उपमेयाचा निषेध करून त्या जागी उपमानाची स्थापना केली आहे. तर दुसऱ्या ओळीत वदन म्हणजे तोंड याचा निषेध करून तो शरद ऋतूचा चंद्र आहे असे सांगितले आहे म्हणून येथे अपन्हुती अलंकार होतो.
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा